गडचिरोली:- परिचारिका म्हणून कार्यरत पत्नीशी वाद झाल्यानंतर रागाच्या भरात बीडच्या एका तरुणाने चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील वैनगंगेच्या महाकाय नदी पात्रात उडी घेतली.वाहत असतानाच हाती खडक लागला अन् मग जीवाच्या आकांताने मदतीसाठी आक्रोश केला. प्रसंगावधान राखून पोलिस धावले व अखेर त्याचे प्राण वाचविले. २० सप्टेंबरला सकाळी सात वाजता हा थरारक प्रसंग घडल्याचे वृत्त आहे.
प्रदीप देविदास शेप (३०, रा. शेपवाडी ता.आंबेजोगाई जि.बीड असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याची पत्नी दिप्ती शेप मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. प्रदीपचा अंबाजोगाईत हॉटेल व्यवसाय आहे. पत्नीला भेटण्यासाठी तो नेहमी मुलचेराला येतो. दोन दिवसांपूर्वी तो पत्नीकडे आला होता. मात्र, कौटुंबीक कारणावरुन पत्नीशी बिनसल्याने २० रोजी पहाटेच जीपमधून (एमएच २४ बीएल-२५८५) तो आष्टी येथे पोहोचला. वैनगंगा नदीवरील पुलावर जीप उभी करुन त्याने नदीपात्रात उडी घेतली. यानंतर तो पाण्यात बुडाला. प्रवाहात तो वाहत गेल्यानंतर अचानक खडक हाती लागला अन् त्याने खडक घट्ट पकडून आक्रोश करण्यास सुरुवात केली.
*आष्टी पोलिसांनी त्वरित घेतली धाव.*
पुलावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळविले.आष्टी ठाण्याचे पो.नि. विशाल काळे यांनी अंमलदार रवींद्र मेदाळे, संतोष नागुलवार, रॉयसिडाम राजूरकर, प्रकाश राऊत यांच्यासह तात्काळ धाव घेतली. नावेच्या सहाय्याने त्याच्यापर्यंत पोहोचून त्यास बाहेर काढले. त्यास आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.