जयाताई लाभसेटवार
उपसंपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स
नागपूर:- अतिवृष्टीची रक्कम बोगस शेतकऱ्यांच्या नावे लाटल्याप्रकरणी कुही तालुक्यातील सहा तलाठ्यांसह एका महसूल सहाय्यकास निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी बोगस शेतकऱ्यांच्या नावे अतिवृष्टीची जवळपास १ कोटी ४० लाखांची रक्कम लाटली असून ही सर्व रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.
सरकारने २०२२-२३ या वर्षामध्ये शेत पिकांच्या नुकसानीच्या भरपाईकरिता १३ हजार ६०० रुपये प्रतिहेक्टरी मदत घोषित केली. मात्र कुही तालुक्यात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांची नावे सरकारला सादर केली आणि अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे लाटले. यासाठी मूळ शेतकऱ्यांच्या खसरा क्रमांकाचा वापर करण्यात आला. १४ हजार शेतकऱ्यांची रक्कम वळती करण्यात आली.
ही रक्कम ३४ कोटींच्या घरात असल्याचा मुद्दा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उमरेडचे उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या अध्यक्षेत पास सदस्यीय चौकशी समिती गठित केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चौकशी समितीला आरोपामध्ये तत्थ्य आढळून आले. त्यांनी जवळपास १ कोटी ४० लाखांची रक्कम लाटल्याचे चौकशीत समोर आले.
शासनाची केली फसवणूक.
याप्रकरणी रॉजर गेडाम, स्नेहदीप मेश्राम, अनंत कासोट, मोहित पाटील, शालीनी मोकाशी व आकाश शेंडे या सहा तलाठ्यांना निलंबित करण्यात आले. त्याच प्रमाणे महसूल सहाय्यक प्रमोद तिजारे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. तलाठी वैशाली पडोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली. तर कुहीचे तत्कालीन तहसीलदार शरद कांबळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला.