यवतमाळ:- दारव्हा शहराला जवळपास अठरा ते विस महिन्यापासून ट्राफिक इंचार्ज नाही.त्यामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीने कळस गाठल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने,ऑटोचालकांच्या मनमानीमुळे सामान्य नागरिक वेठीस धरल्या जात आहे. अनियंत्रित वाहतुकीमुळे शहरातील मुख्य मार्गांवर अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरात बसस्थानक, गोळीबार चौक, तहसील कार्यालया समोरील रस्ता,भारतिय स्टेट बँक समोरिल रस्ता , मेन लाईन रोड, नवीन कोर्ट, आठवडी बाजार ही प्रमुख वर्दळीचे ठिकाण आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून सतत वाहनांची ये-जा असते. दरम्यान, या प्रमुख मार्गांवर पार्किंगची कुठेच व्यवस्था नसल्यामुळे अवैध वाहतूक करणारी वाहने, ऑटो, दुचाक्या, मालवाहू वाहने वाटेल तिथे मनमानी उभी केली जातात.
प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना विशिष्ट थांबे नसल्यामुळे, ऑटोमध्ये प्रवासी मिळवण्यासाठी ही वाहने एकदम येऊन मधेच उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. शहरात यापूर्वी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनेक अपघात झाले आहेत. यात प्रवाशांचे जीवही गेले आहेत.बस स्टॅण्ड ते गोळीबार चौक या प्रमुख रस्त्यावर पार्किंगची सोय उपलब्ध नसल्यामुळे अस्ताव्यस्त वाहने तासंतास उभी केली जातात. त्यामुळे नागिरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ट्राफिक इन्चार्ज म्हणून कोणीतरी अधिकारी दारव्ह्याला मिळवा. या बाबी कडे वरिष्ट अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी मागणी दारव्हा शहरातील व तालुक्यातील नागरिक करीत आहे.
नगरपरिषद झोपेत
शहरातीलमुख्य बाजारपेठेत पार्किंगची सोय नसल्यामुळे वाहने नेमकी कुठे उभी करावी, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. परंतु, शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे शहाणपण अद्यापही नगर परिषदेला सुचत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. नगर परिषदेचे पार्किंगच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.
बसस्थानकासमोर खासगी वाहनांचा कहर
बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. यात हातगाड्यांचाही माेठ्या प्रमाणात समावेश आहे. यवतमाळ जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सही बस स्टॅण्ड समोरच लागतात. यामुळे येथे सतत नागरिकांची वर्दळ असते. त्यातच बसस्थानकातील प्रवाशांची सतत गर्दी राहते. त्यातच प्रवासी मिळवण्यासाठी येथे , ऑटोचालकांची मनमानी असून, वाटेल तेथे वाहने उभी केली जातात.
दर्यापूर शहरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे ठिकठिकाणी वाहने उभी असतात.
शहरातील मुख्य मार्गांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश संबंधितांना देण्यासाठी ट्राफिक पोलीस इंचार्ज च नाही. तसेच आपल्या कर्तव्यात हयगय करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यासाठी ट्राफिक पोलीस इंचार्ज नसल्याने त्यांनाही मुभा मिळाली आहे.त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे.
वाहतुक पोलिसांचे होतेय दुर्लक्ष
शहरातीलप्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलिस उभे असताना त्यांच्या डोळ्यासमोर वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. पोलिसांच्या डोळ्यादेखत कुठेही वाहने उभी केली जातात. अवैध वाहतूकदार वाहने प्रवाशांनी गच्च भरून पोलिसांच्या डोळ्यादेखत भरधाव धावतात. परंतु, पोलिस याकडे डोळेझाक करतात,असा आरोप नागरिकांनी केला आहे.
दारव्हा शहरातील विविध ठिकाणी वर्दळीच्या मार्गावर अशी बेशिस्त वाहतूक असून रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाहने उभी केली जाते.