पेरमिली आठवडी बाजाराच्या लिलाव प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप; गटविकास अधिकारी अहेरी यांच्याकडे केली तक्रार.
पेरमिली(अहेरी):– तालुक्यातील पेरमिली येथील आठवडी बाजार लिलाव वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याचे दिसून येत आहे. बाजाराच्या लिलाव प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित लिलाव रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने लिलाव घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
पेरमिली ग्राम पंचायतीने 24 मार्च रोजी आठवडी बाजार लिलावा करिता परिपत्रक काढले होते. लिलावाची तारीख 30 मार्च ठेवण्यात आले होते. सदर लिलाव नियमानुसार झाले नसल्याचे आरोप करत १ एप्रिल रोजी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमरनाथ गावडे व सचिव साईनाथ चंदनखेडे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती अहेरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे. सदर निवेदनामध्ये लिलाव प्रक्रियेदरम्यान नियमांचा उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा म्हटले आहे. याचबरोबर सोमवारच्या आठवडी बाजारानंतर अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याचे वास्तवही निवेदनात मांडण्यात आले आहे. या अस्वच्छतेमुळे अंगणवाडीतील लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाने या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेऊन सध्याची लिलाव प्रक्रिया रद्द करावी, नव्याने पारदर्शक लिलाव प्रक्रिया राबवावी आणि अंगणवाडी परिसरात स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीने काढलेली आठवडी बाजार लिलाव नोटीस.
1) बोली बोलण्यापूवी बाजार लीलावासाठी 5000 रु अनामत ठेवावी लागेल. बोली ज्याच्या नावाने पुर्ण होईल एकंदर 50 टक्के रक्कम त्याच वेळी दयावी लागेल. जर लिलाव झाल्याबरोबर शेकडा 50 टक्के रक्कम वाढविली नाही तर लीलावाच्या वेळी ठेवलेली अनामत रक्कम परत केली जाणार नाही. व पुन्हा लिलाव केल्या जाईल. ठेकेदारास त्यात जो नुकसान होईल पहिल्या ठेकेदाकडुन वसुल केला जाईल. ठेकेदारास हैसीयत प्रमाणपत्र सादर करावा लागेल. व्यतिरीक्त ईतर ठेवावयाची रकम पुर्ण द्यावे लागेल.
2) ठेवल्यापैकी उरलेली रक्कम समान दोन किस्तीत दिनांक 31/12/2027 पर्यंत द्यावी लागेल. किस्तीची रक्कम ठरलेल्या तारखेला न पटविल्यास तो ठेका शिल्लक मुददती करीता पुन्हा लिलाव करण्यात येईल. त्यामुळे जो ग्रा.प. चा जो नुकसान होईल सबंधीत ठेकेदारकडुन वसुल केला जाईल.
3) लिलाव संपताच सात दिवसाच्या आत 100 रू च्या स्टॉम्पपेपरवरती करारनामा लिहुन दिल्यानंतर ठेकेदाराला बाजार फि वसुल करण्याचा परवाना दिला जाईल. ग्रामपंचायतीने ठरविलेल्या धारेबंदीनुसारच कर वसुली करावी लागेल. बाजाराकरीता उपयोगी लागणारे पावती ठेकेदारास स्वता छापुन ग्रा.प. पेरमिलीचा शिक्का असल्याशिवाय वसुल करता येणार नाही. दिनांक 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत वसुलीचा अधिकार देण्यात येईल.
4) नियमाच्या विरुध्द वसुली केल्यास उचीत कार्यवाही करूण ठेका रदद करण्यात येईल.
5) अटी शर्तीचे अंमलबजावणी न झाल्यास बाजाराचा ठेका रदद करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीकडे राहील.
6) ज्या ठेकेदाराकडे बाकी येणे राहील त्याची बोली स्वीकारली जाणार नाही. तसेच एखादयाने बोली जास्त बोली बोलल्यास ठेका देणे किंवा न देणे. लिलाव अधिका-याकडे राहील. वरिलपैकी ठेका रदद करणे तिन बोलीवर देणे किंवा नियमात बददल करणे हे पंचकमीटीचे स्वाधीन राहील.
7) किमाण बोलीची रक्कम 500 रू च्या अंतराने बोलणे बंधणकारक राहील.
बाजार लिलाव प्रक्रिया नियमानुसारच:- ग्रामसेवक बडगु.
पेरमिली येथील आठवडी बाजार लिलाव प्रक्रिया 30 मार्च रोजी घेण्यात आले. या लिलाव प्रक्रियेत अनेकांनी सहभाग घेतला. लिलाव प्रक्रिया प्रशासक व नागरिकांच्या उपस्थितीत नियमानुसारच घेण्यात आले.
बाजार लिलाव प्रक्रियेत चार जणांनी लावली बोली.
पेरमिली येथील आठवडी बाजार लिलाव प्रक्रियेत रणजीत शामराव खोब्रागडे रा. आलापल्ली, कैसरअली फैयाजअली सय्यद रा. आलापल्ली, त्रिवेणी महिला बचत गट रा. भामरागड, कवीश्वर माधव चंदनखेडे रा.पेरमिली यांनी पाच हजार रुपये अनामत रक्कम भरून सहभाग घेतला होता. यामध्ये सर्वात जास्त बोली एक लाख वीस हजार रुपये भामरागड येथील त्रिवेणी महिला बचत गट यांनी लावली.
या बाजार लिलाव प्रक्रियेत ग्रामसेवक सत्यनारायण बडगु, प्रशासक किरण नैताम, प्रमोद आत्राम, सुनील सोयाम, साजन गावडे, बंडू दहागावकर, राजेंद्र इस्टम, तुळशीराम चंदनखेडे, सपना बंडमवार, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
