
गडचिरोली:- जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क आणि गट-ड मधील रिक्त असलेल्या विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकांमधून भरली जाणार आहेत. त्याअनुषंगाने सन 2023 मध्ये पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणांची तपासणी करून पूर्ण माहिती असलेल्या एकूण 251 उमेदवारांची अंतिम जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या दस्तावेजांची पडताळणी दि.22 आगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात केली जाणार आहे.
उमेदवारांची ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या फलकावर प्रकाशित करण्यात आली होती. अनुकंपा तत्वावर नियुक्ती संबंधाने आवश्यक शैक्षणिक दस्तऐवजाची पडताळणी करण्यासाठी प्रकरण पूर्ण असलेल्या अनुकंपाधारक प्रतीक्षाधिन सुचीतील अनुक्रमांक 1 ते 150 पर्यंतच्या उमेदवारांनी मुळ दस्ताऐवजांच्या दोन छायांकित प्रतींसह जिल्हा परिषदेत उपस्थित राहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार यांनी केले आहे.
प्रतिक्षाधिन सुचीतील अनुकंपाधारकांना केवळ दस्ताऐवज पडताळणीच्या प्रक्रियेकरीता बोलविण्यात येत असल्याने उमेदवारांना नेमणुकीकरीता हक्क प्रस्तावित करता येणार नाही. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला, भूलथापांना बळी पडू नये याची असेही शेलार यांनी कळविले.