तलाठी मुख्यालयी हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांचे अनेक समस्या सुटेना;जारावंडीतील महिलांचा महसूल कार्यालयावर मोर्चा.
जारावंडी: गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी परिसरातील 200 महिलांनी महसूल प्रशासना विरोधात एल्गार पुकारत महसूल कार्यालय, जारावंडी येथे भव्य मोर्चा काढला.तलाठी मुख्यालयाला नियमितपणे हजर राहत नसल्याच्या मुद्द्यावरून महिलांनी प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देत ही समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली आहे.
जारावंडी परिसरातील नागरिकांना, विशेषतः महिलांना, सरकारी कामकाजासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तलाठी कार्यालयात वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नोंदी, सातबारा उतारे, आणि अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रशासना विरोधात महिलांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
तलाठ्यांच्या रिक्त पदामुळे कामात दिरंगाई:- तहसीलदार हेमंत गांगुर्डे तहसीलदार एटापल्ली
मोर्चा दरम्यान महिलांनी एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांना फोनवर विचारणा केली की, तलाठी नियमित उपस्थित का राहत नाही? यावर तहसीलदारांनी उत्तर दिले की, तालुक्यात तलाठ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने काही तलाठ्यांना दोन साज्यांचा भार देण्यात आला आहे, त्यामुळे कामात दिरंगाई होत आहे.
तलाठ्याचे कामे कोतवालाने केले तर नागरिकांचे समस्या सुटणार का? महिलांनी केला सवाल
जारावंडी येथील महसूल मंडळ कार्यालयात तलाठी नियमित येत नसल्याने कोतवालाच्या भरोशावर सर्व कामे सुरू असल्याचा आरोप महिलांनी केला.
कोतवाल तलाठ्यांचे काम करत असतील, तर नागरिकांचे प्रश्न खरोखर सुटणार का? परिसरात होत असलेल्या अवैध वाळू उपसा, खोदकाम आदी अवैध कामांवर कोण नियंत्रण ठेवणार? असा सवाल उपस्थित करत महसूल प्रशासनावर कडक टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर ही समस्या लवकरच सोडवली गेली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.या आंदोलनात अनेक ग्रामस्थ महिलांसह सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते सहभागी झाले होते.