
नागपूर:- नागपूर मध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी १३ जणांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर २ पोलीस कर्मचाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलं आहे.यामुळं भरती परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे.
नागपूरमध्ये पोलीस भरतीत लेखी परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या 13 परीक्षार्थींना नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी अपात्र घोषित केलं आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबतची तक्रार आयुक्तांकडं आली होती. या तक्रारीत म्हटलं होतं की, भरतीच्या लेखी परीक्षा दरम्यान विद्यार्थी कॉपी करत असताना त्याकडं पीएसआय आणि दोन शिपायांनी दुर्लक्ष करत त्यांना परीक्षेत गैरप्रकार करण्यास अप्रत्यक्ष मदत केली.
या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत पोलीस आयुक्तांनी पीएसआय आणि दोन पोलीस शिपायांना निलंबित केलं होतं. त्यामध्ये आता पोलीस आयुक्तांनी 13 परीक्षार्थींना अपात्र घोषित केलं. या धडक कारवाईमुळं आता राज्यात खळबळ उडाली आहे.